Satara : पाचगणीत अनधिकृत उत्खनन प्रकरणी कारवाई

भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील नगर परिषद हद्दीतील भूखंड क्र. टीपी स्कीम 03, 533 मध्ये अनधिकृतरित्या उत्खनन करणार्या अनमोल कांबळे आणि त्याच्या सहकार्यांवर ग्राम महसूल अधिकार्यांनी कारवाई केली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल कांबळे आणि त्याचे सहकारी नगर परिषद हद्दीतील जागेवर मुरुम टाकून, उत्खनन आणि सपाटीकरणाचे काम करत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पाचगणीच्या ग्राम महसूल अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 19) जागेवर जाऊन पंचनामा केला. त्यावेळी अनमोल कांबळे व त्याच्या सहकार्यांनी शासकीय कामात अडथळा आणला.
अनमोल कांबळे याने समाज माध्यमावर प्रशासनाची नाहक बदनामी केली आणि सूर्यास्तानंतर पुन्हा उत्खनन सुरू केले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून, पोकलँड मशीन आणि ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. महाबळेश्वरचे तहसीलदार रूपेश शिंदे, पाचगणीचे ग्राम महसूल अधिकारी तथा मंडलाधिकारी सागर शिंदे, पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली.
यापूर्वी, भोसे, ता. महाबळेश्वर येथील स. नं. 26/3/5अ मध्ये अनधिकृत उत्खनन केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(7)(8) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे.
त्यामुळे विकसनाचे काम करताना तहसील कार्यालयाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. विनापरवाना उत्खनन किंवा गौणखनिजाची वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.





