पुणे | दोन दिवसांत १५४ वाहनचालकांवर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली असून, शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून १५४ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. गुरुवार आणि शुक्रवारी (ता. ३० व ३१) या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान दोन हजार ५७३ वाहनांची तपासणी केली. त्यातील १५४ वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे उघडकीस आले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वांत जास्त १४ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर मुंढवा हद्दीत १० आणि खडक व कोरेगाव पार्क हद्दीत प्रत्येकी नऊ कारवाया करण्यात आल्या आहेत.
ड्रंक ॲण्ड ड्राइव्हसोबत इतर ६८५ कारवाया करून सहा लाख २४ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यातील एक लाख ४९ हजार ८०० रुपये दंड नाकाबंदीदरम्यानच वसूल करण्यात आला आहे.
दोन पोलीस अधिकारी व सात अंमलदार
वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनकडून संयुक्तपणे संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये २२ पोलीस ठाण्यांअंतर्गत २४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
या कारवाईसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व चार अंमलदार व वाहतूक शाखेकडील एक पोलीस अधिकारी व तीन अंमलदार याप्रमाणे एका नाकाबंदीच्या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी व सात अंमलदार नेमण्यात आले होते. ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह कारवाईसाठी ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्यात आला




