पुणे जिल्हा | आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई

शिरूर, (वार्ताहर)- शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १५ पासून आचारसंहिता चालू झाली आहे. निवडणूक काळामध्ये राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचे कडेकोट पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिला. शिरूर येथे पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.
दरम्यान, शिरूर-हवेली विधानसभेसाठी प्रशासन सज्ज झाले असून (दि.२२) पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, हे उमेदवारी अर्ज शिरूर तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या चेंबरमध्ये स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजापूरकर म्हणाल्या की, निवडणूक काळामध्ये कायदा सुव्यवस्था व आचारसंहितेचे पालन व्हावे, याकरिता निवडणूक आयोगाने तक्रार ॲप तयार केले आहे.
त्यावर तक्रार करायची आहे. त्या तक्रारीचे निरासन करण्यात येणार आहे. यासाठी शिरूर तहसील कार्यालय येथे कंट्रोल रूमची उभारणी केली आहे.
या अनुषंगाने शिरूर- हवेली तालुक्यामध्ये नऊ फ्लाईंग स्कॉडची स्थापना केली असून हे २४ तास कार्यरत राहणार आहेत. ३ स्थायी पथकाची नेमणूक केली असून शिरूर तालुक्यासाठी दोन तर हवेली तालुक्यासाठी वाघोली येथे १ पथक असणार आहे.
शिरूर सतराकमानी पुलाजवळ एक चेक नाका तसेच तांदळी येथे एक चेक नाका असणार आहे. त्याबरोबर एक फिरते पथक राहणार आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण ४ लाख ५९ हजार ६९३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार २ लाख ३८ हजार ८९७ तर महिला मतदार २ लाख २० हजार ७७३ तर इतर २३ इतके आहेत. शिरूर- हवेली तालुक्यात करिता ४५७ मतदान केंद्र असल्याचे राजापूरकर यांनी सांगितले आहे.
परवानगीसाठी एक खिडकी योजना
राजापूरकर म्हणाल्या की, उमेदवारांना त्यांच्या सभेसाठी, रॅलीसाठी, लाऊड स्पीकरसाठी, वाहनांसाठी, इतर शासकीय परवानगीसाठी शिरूर तहसील शिरूर तहसील कार्यालय येथे एक खिडकी योजना सुरू केली आहे.
त्यासाठी नायब तहसीलदार तसेच नागरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, महसूल विभाग व इतर विभागाचे अधिकारी या ठिकाणी परवानगी देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





