संतोष कचरे आंबेगाव बुद्रुक, दि. 1 -भाऊ, दादा, मामा, पाटील असे लिहलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरची वाहने कात्रज, आंबेगाव, नऱ्हे परिसरासह उपनगरांत मोठ्या प्रमाणात धावत आहेत. कायदे आणि वाहतूक नियमांचे सर्व नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारे वाहने दामटली जात आहेत, अशा वाहनांवर सुधारित दंड कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी सांगितले.
कात्रज, आंबेगाव, नऱ्हे परिसरासह महामार्गावर अशा नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून खास ड्राइव्ह घेण्यात येत आहे. नंबर प्लेट दादा, मामा अशा अक्षरात असल्यास पहिल्यांदा कारवाई झाल्यास 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा तोच अपराध केल्यास दीड हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. सुधारित वाहतूक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. पुणे वाहतूक शाखा यासाठी खास ड्राइव्ह घेत आहे.
वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनांवर दादा, मामा यासह अन्य काही स्टिकर लावलेले असल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत आहेत. अनेक जण वाहनांवर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह सरकार, शासन, व्हीआयपी असेही लिहितात. निर्देशित केलेल्या नंबर शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी सांगितले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे शहरात गेले आठ-दहा दिवसांपासून अशा नंबर प्लेटवर कारवाई सुरू आहे. नव्या तरतुदीनुसार दंड आकारला जात आहे. यापुढेही अशी कारवाई चालू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे
– उदयसिंह शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग