nagar | जिल्ह्यात १३२ आपले सेवा केंद्र चालकांवर कारवाई

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात महसूल विभागाने मंजुरी दिलेले ६४९ तर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलेले १ हजार ३२० केंद्र आहेत जिल्ह्यात एकूण १ हजार ९६९ सेवा केंद्र कार्यरत आहेत. सध्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्याने दाखले काढण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मध्ये गर्दी होत आहे.
या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक सेवा केंद्र चालक जादा दर आकारत आहेत. जादा दर आकारल्यास संबंधित सेवा केंद्र चालकांवर कारवाई जिल्हा सेतू समितीच्या वतीने केली जाते. मागील वर्षभरात विविध कारणांमुळे १३२ सेतू चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
नुकताच इयत्ता दहावी – बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी जातीचे दाखले, उत्पन्न दाखला, जात, अधिवास प्रमाणपत्र, महिला आरक्षण, सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र (ई.डब्ल्यू.एस.), सर्वसाधारण प्रमाणपत्र आदी दाखले शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असतात. राज्य शासनाने हे दाखले त्यांना राहत असलेल्या भागात उपलब्ध होण्यासाठी सेतू केंद्र सुरू केले.
नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे सेतू केंद्रात दिल्यानंतर सेतू चालक ही कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करतात. या कागदपत्रांची तपासणी होऊन सेतू कार्यालयातून प्रमाणपत्र दिले जात होते. नागरिकांच्या वेळीची आणि पैशांची बचत होण्याच्या उदात्त हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली. केंद्र शासनाने काही योजनांसाठी स्थानिक पातळीवर आधार केंद्र सुरू केले.
शासनाच्या इतर विभागांच्या सुविधांसाठी महा- ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले. आधार केंद्र हे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. सेतू आणि महा-ईसेवा केंद्र राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आहेत. सेतू आणि महा-ईसेवा केंद्रांचे एकत्रिकरण करून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे नामांतरण करण्यात आले.
महसूल विभागाने मंजुरी दिलेले ६४९ तर जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलेले १ हजार ३२० केंद्र आहेत जिल्ह्यात एकूण १ हजार ९६९ सेवा केंद्र कार्यरत आहेत.
सेतू चालकांनी दर्शनी भागात कोणत्या सुविधेसाठी किती दर घेतले जातात. याचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. नागरिकांनी ही कोणत्याही दाखल्यासाठी कागदपत्रे दिल्यानंतर पावती घेण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. जादा दर आकारले जात असल्यास कारवाईचे अधिकारी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना आहेत.





