पुण्यात ५२ हजार बेशिस्तांवर कारवाई

पुणे – शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून ५२ हजार ४०५ बेशिस्त पुणेकरांवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३ कोटी २८ हजार १८७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील तीन वर्षांतील ही सर्वाधिक दंडवसुली आणि कारवाईची संख्या आहे. मात्र, त्यानंतरही शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बेशिस्त नागरिकांकडून जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात असल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे खरेच महापालिकेच्या कारवाईचा परिणाम होतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कचऱ्याचे ढीग कायम
शहरात ९२३ क्रॉनिक स्पॉट शोधून काढले होते. या क्रॉनिक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. वर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवरील कारवाईत ३ कोटी २८ लाख १८७ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पालिकेकडे आवश्यक असलेले मनुष्यबळ, नागरिकांकडून कचरा वर्गीकरण करून न देणे, कचरा संकलनातील अडचणी, यामुळे शहरात अनेक भागांत कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र आहे.
कारवाईसाठी १८ पथके
महापालिकेकडून शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी १८ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांना स्वतंत्र वाहने देण्यात आली असून, दिवसभर ही पथके शहरात कारवाई करत असतात. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करून बेशिस्त नागरिकांंवर कारवाई केली जात आहे.
या कारवाईत सर्वाधिक प्रमाण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे आहे, तर अनेक नागरिक वर्गीकरण करत नसल्याने हा कचरा महापालिकेच्या संकलन यंत्रणेत देत नाहीत. ते नागरिक रस्त्यावर जागा मिळेल तिथे कचरा टाकतात. त्यामुळे हे पथक अशा व्यक्तींकडून दंड वसूल करत आहे.





