रिंगरोडसाठी 200 एकर जागेचे संपादन; हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले यांची माहिती

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम रिंगरोडसाठी हवेली तालुक्यातील 14 गावांमधील सुमारे 200 एकरहून अधिक जागेचे संपादन करण्यात आले आहे, अशी माहिती हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांबी आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम, असे दोन टप्प्यात या रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व भागातील मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावातून रिंगरोड जाणार आहे. तर पश्चिम भागातील भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांतून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.
या रस्त्यासाठी 44 गावातील सुमारे साडेसातशे हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. दि.5 जुलैपासून पश्चिम मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी बांधितांना नोटिसा देऊन संमतीपत्रे सादर करण्याची मुदत दि.21 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.
प्रांताधिकारी आसवले यांनी सांगितले की, हवेलीतील 14 गावातील सुमारे दोनशे एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामध्ये पूर्व भागातील रिंगरोडसाठी चार गावातील, तर पश्चिम भागातील रिंगरोडसाठी दहा गावातील क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले. या 934 खातेदारांना मोबदल्यापोटी 276 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.





