थेऊर / सोरतापवाडी – करोना पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील आणखी 3 खासगी रूग्णालयातील 80 टक्के बेड, व्हेंटिलेटर्स व आयसीयू अधिग्रहीत करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. यामुळे तालुक्यात अधिग्रहीत रुग्णालयांची संख्या 13 झाली आहे. एकूण 1757 बेड, 63 आयसीयू व 20 व्हेंटीलेटर्स करोना रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आणखी 3 रूग्णालयांची भर पडली आहे.
निसर्गोपचार केंद्र (उरुळी कांचन), लोटस हॉस्पिटल (शेवाळेवाडी फाटा) व योग मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल (मांजरी बुद्रुक) ही तीन रुग्णालये अधिग्रहीत करण्यात यावीत असे आदेश हवेली उपविभागीय कार्यालयातून गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच हडपसर व मंडल अधिकारी व शेवाळेवाडी, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुक व हडपसरचे गावकामगार तलाठी यांना बजावण्यात आले.
यापूर्वी 8 जुलै रोजी भारत संस्कृती दर्शन ट्रस्ट, आयमॅक्स हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल व केअर हॉस्पिटल (वाघोली), पल्स हॉस्पिटल (नऱ्हे), महेंश स्मृती हॉस्पिटल (शेवाळेवाडी), प्रयागधाम हॉस्पिटल व चिंतामणी हॉस्पिटल (कोरेगावमुळ), श्लोक हॉस्पिटल (शिवापूर), शिवम हॉस्पिटल (कदमवाकवस्ती), नवले हॉस्पिटल (नऱ्हे), विश्वराज हॉस्पिटल (लोणी काळभोर) ही 10 रूग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. यांतील एकूण 1757 बेड, 63 आयसीयू व 20 व्हेंटीलेटर्स करोना रूग्णांसाठी उपलब्ध झाली आहेत.