‘कुछ तो गड़बड़ है, दया!’ बँक कॅशियर ते एसीपी प्रद्युमन! जाणून घ्या शिवाजी साटम यांचा प्रवास….

२३ वर्ष बँकेत पैसे मोजत बसणारा हा इसम एक दिवस टेलिव्हिजनवर ‘एसीपी प्रद्युमन’ बनून घराघरात पोहोचेल याची कोणी कल्पनाही केली नसावी. बँकेत काम करणाऱ्या या कॅशियरचे नाव आहे शिवाजी साटम अर्थात सर्वांची आवडती मालिका CID मधील ‘एसीपी प्रद्युमन’.
फार कमी लोकांना माहिती असेल मात्र शिवाजी साटम हे बँकेत नोकरी करत. नौकरी करत असताना मात्र त्यांनी आपल्या थिएटरच्या पॅशनला कधीही कमी होऊ दिलं नाही. “बँक माझ्या कलेला सबसिडी देत होती,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.
२३ वर्ष बँकेतील नोकरी सांभाळताना त्यांनी थिएटरला वेळ दिला, एक दिवस थिएटर कॉम्पिटीशनमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
यानंतरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये कामं करायला सुरुवात केली. त्यांची अभिनयाची जाण बघून लवकरच त्यांना बॉलिवूडमध्येही कामं मिळाली. ‘नायक’ आणि ‘सूर्यवंशम’सारख्या हिट चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. पण या इंडस्ट्रीत स्वतःचं ठसा उमटवणं अद्यापही बाकी होत.
१९९८ मध्ये त्यांना एक मोठी संधी आली – ती म्हणजे ‘सीआयडी’ मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका! शिवाजी साटम यांनी या पात्रासाठी एवढी मेहनत घेतली की त्यांची ‘कुछ तो गड़बड़ है, दया!’ ही आयकॉनिक लाईन घराघरांत पोहोचली. त्यांची अभिनयशैली आणि पात्रावरची कमाल पकड यामुळे हे पात्र खऱ्या अर्थाने त्यांची ओळख बनलं.
“माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी मनापासून काम करतो. थिएटर पाहून शिकल्यामुळे मी भूमिकांमध्ये वेगवेगळे रंग आणू शकलो,” असं ते नेहमी म्हणतात.
२२ वर्ष ‘सीआयडी’ची धूम
‘सीआयडी’ ही मालिका २२ वर्षे टीव्हीवर चालत राहिली. याच शोने अनेक कुटुंबांना जोडून ठेवलं, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची मनं जिंकली. लता मंगेशकर यांच्यासारख्या महान गायिकेपासून अनेक दिग्गजांनी या शोचं कौतुक केलं.
आता ‘सीआयडी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामुळे त्यांच्या चाहत्यांना शिवाजी साटम अर्थात एसीपी प्रद्युमन ‘कुछ तो गड़बड़ है, दया!’ म्हणताना पाहता येणार आहेत.
“मी ४५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. पहिल्यांदा १९७६ मध्ये थिएटर केलं होतं, आणि तेव्हापासून हा प्रवास मी मनापासून जगतोय,” असं शिवाजी साटम अभिमानाने सांगतात.





