Rajgurunagar : आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणारः रुपाली चाकणकर

राजगुरूनगरः तालुक्यात दोन सख्या बहिणींना एका परप्रांतीय नराधम व्यक्तीने जीवे मारून टाकल्याच्या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या प्रकरणात नराधम आरोपीने या बहिणींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार करून दोन्ही बहिणींची पाण्याच्या बॅलरमध्ये बुडवून हत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटल्याचे पाहिला मिळत आहेत. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. आता या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
चाकणकर यांनी या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून आरोपीला फाशीची शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दिले आहे. राजगुरूनगर व लोणावळा येथील घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत. राजगुरूनगर येथील केस ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालेल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणारः चाकणकर
तसेच पोलिसांनी या प्रकरणी अॅक्शन घेत आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी बोलताना चाकणकर यांनी दिले.
आरोपीला 3 ते चार तासात अटक केली आहे. आज त्या आरोपीला खेडच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्या आरोपीच्या विरोधात स्ट्रॉंग चार्जशीट दाखल करणार आहे. नातेवाइकांचा भावनिक उद्रेक होणे साहजिकच आहे, त्यांना मनोधर्य योजनेतून मदत दिली जाणार आहे. आरोपी जरी पश्चिम बंगालचा असला तरी खूप वर्षांपासून इकडे राहतो. खेडच्या आरोपीची 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला मिळाली आहे. नागरिकांनी आपल्याकडे भाडेकरू रहातात त्याची माहिती पोलीस प्रशासनाला देणे अपेक्षित आहे.
पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण)





