आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली – विधान परिषदेच्या काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी (८ फेब्रुवारी) रात्री ८.३० वाजता कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. या हल्लेखोराने प्रज्ञा सातव मार्गदर्शन करत असताना त्यांना मागे ओढून त्यांच्या गालात चापट मारली. या सर्व घटनेची माहिती सातव यांनी सोशल मीडियावर दिली.
दरम्यान, प्रज्ञा सातव बुधवारी रात्रीच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. त्या गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना एक व्यक्ती पाठीमागून आला आणि त्याने अचानक सातव यांना बाजूला ओढून त्यांच्या गालावर चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सातव तसेच गावकरीही गोंधळून गेले. सातव तातडीने वाहनात बसून थेट कळमनुरीत दाखल झाल्या. त्यानंतर रात्री कळमनुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे या आरोपीस ताब्यात घेतले.
सदरील घडलेल्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या हल्ल्यानंतर सातव समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला तात्काळ अटक केली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





