Nevasa News : बलात्कार प्रकरणात आरोपीला नऊ दिवसात जामीन मंजूर : अॅड.निरज नांगरे

नेवासा : नेवासा जिल्हा व सत्र न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अवघ्या नऊ दिवसांत जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप होता. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करणारे नेवासा येथील ज्येष्ठ वकील अॅड. निरज नांगरे यांनी हा जामीन मिळवण्यात यश मिळवले असून, त्यांच्या युक्तिवादाने न्यायालयात निर्णायक ठरले.
नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९४/२०२५ अंतर्गत एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा, १९८९ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. नेवासा पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
या खटल्यात आरोपीच्या वतीने अॅड. निरज नांगरे यांनी जामीन अर्ज (क्र. २३९/२०२५) दाखल केला. नेवासा जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) यांच्यासमोर सुनावणीवेळी नांगरे यांनी युक्तिवाद केला की, “आरोपी आणि पीडित महिलेमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा ठरू शकत नाही.” हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि आरोपीला जामीन मंजूर करताना जातमुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपीला तात्काळ सोडण्यात आले.
या प्रकरणात अॅड. निरज विलास नांगरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर त्यांना अॅड. शेखर गोर्डे यांनी सहाय्य केले. याशिवाय, ज्येष्ठ वकील अॅड. एस.टी. आरगडे यांनी मार्गदर्शन करून या जामीन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.





