nagar | बस लूट प्रकरणातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद

नगर (प्रतिनिधी) – नगरमधून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसमधील प्रवाशाला शिर्डीमध्ये लुटण्याचा प्रकार २०१५ मध्ये घडला होता. या प्रकरणातील मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव) हा नऊ वर्षांपासून फरार होता. त्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
दि. २८ एप्रिल २०१५ रोजी घटनेतील फिर्यादी रमेशभाई भाईचंद पटेल ( हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली) हे अहमदनगरहून लक्झरी बसने सुरत, गुजरात येथे निघाले होते. जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही चोरी करुन आले असून पोलीस स्टेशनला चला असे सांगत लक्झरी बसमधून खाली उतरून तवेरा गाडीत बसवले व त्यांच्या जवळील पाच लाख रुपये रोख रक्कम काढून घेतले.
त्यानंतर फिर्यादीस कोपरगाव येथे सोडून देत त्यांनी पळ काढला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरु (सर्व रा. केडगाव), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), नितीन पटेल यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता. यातील मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता.
दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी पथकातील राजेंद्र वाघ, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे आदींचे पथक नेमून कारवाई सुरु केली.
वरील आरोपीचा शोध घेत असताना तो गोंदीया, नागपूर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. हा आरोपी २८ मार्च रोजी कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे. अशी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली. पथकाने लागलीच तेथे जात पोलिसानी छापा टाकत त्यास ताब्यात घेतले.





