‘या’ एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये महागठबंधनला बहुमत

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल, असे चित्र दिसत असताना, विरोधी पक्षांच्या महागठबंधनसाठी (Mahagathbandhan) चिंता वाढली आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये महागठबंधन शंभरीचा आकडाही गाठू शकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र, या निराशाजनक परिस्थितीतही, ‘जर्नो मिरर’ (Journo Mirror) या एका एक्झिट पोलने राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि महागठबंधनसाठी आशेचा एक मोठा किरण दाखवला आहे. इतर सर्व पोलच्या विरोधात जात, ‘जर्नो मिरर’च्या अंदाजानुसार, बिहारमध्ये महागठबंधनला १३० ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा एक्झिट पोल खरा ठरल्यास, तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनून महागठबंधन स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करू शकते.
इतर प्रमुख एक्झिट पोलचा कल –
| एक्झिट पोल | NDA (जागा) | महागठबंधन (जागा) |
| MATRIZE-IANS | १४७-१६७ | ७०-९० |
| Chanakya | १३०-१३८ | १००-१०८ |
| Poll Diary | १८४-२०९ | ३२-४९ |
| Polstrat | १३३-१४८ | ८७-१०२ |
‘पोल ऑफ पोल्स’नुसार एनडीए १५० ते १७० जागा जिंकत असून महागठबंधन ६८ ते ८० जागांवर समाधान मानेल, असे अनुमान आहे. परंतु, ‘जर्नो मिरर’चा हा एकमेव अंदाज महागठबंधनच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. आता खरी सत्ता कोणाची, याचा फैसला 14 नोव्हेंबरला मतमोजणीनंतरच होणार आहे.





