नागठाणे -नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी झालेल्या बैलगाडा शर्यती पाहायला आलेल्या बिरेंदर सिंग (रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. पंजाब राज्य) यांचा अपघाती मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी, नागठाणे येथे बुधवारी दुपारी मोठी बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यतीत राज्यभरातून 280 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या शर्यतीच्या फेऱ्या दुपारी 12 च्या सुमारास सुरू झाल्या. राज्यभरातून नामांकीत बैलगाड्या आल्याने प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती. सगळ्या फेऱ्या व्यवस्थित झाल्यानंतर उपांत्य फेऱ्या सुरू झाले. त्यावेळी प्रेक्षकांची संख्याही वाढली. चौथ्या फेरीच्या गाड्या सुटल्यानंतर सीमारेषेसमोर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या प्रेक्षकांमधील बिरेंदर सिंग यांना वेगवान बैलगाडीची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. आयोजकांनी शर्यतस्थळी तैनात ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून सिंग यांना नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले; परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार हणमंत सावंत तपास करत आहेत.