Accident news : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा शहराजवळील औंढे गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. स्वारगेटहून वसई (मुंबई) कडे निघालेल्या या बसचा टायर अचानक फुटल्यामुळे बसचा ताबा सुटून ती थेट रस्त्यावरील तीन साईड बॅरेकेट्स तोडत विरुद्ध दिशेच्या तीन लेन ओलांडून सर्व्हिस रोड पार करीत एका टेकडीवर जाऊन धडकली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून बसचा चालक पाय अडकून बसमध्येच सुमारे तासभर अडकून होता. सदरची बस जेव्हा यमदूत बनून रस्त्यावरून काही काळ धावत होती तेव्हा सुदैवाने या बसच्या समोर इतर कोणतीही गाडी न आल्याने मोठा अपघात टळला आणि जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि आयआरबी कर्मचाऱ्यांनी बचावकार्य हाती घेतले. हा अपघात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळ देखरेख व्यवस्थेकडे बोट दाखवित आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या नियमित तपासण्या, टायरची स्थिती आणि मेंटेनन्स कामकाज व्यवस्थितपणे पार न पडल्यास अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असते. दरम्यान, या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. लोणावळा परिसरातील कार्ला, मळवली आणि लोहगडकडे जाणारा मार्गही तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता.