Accident News : डंपर खाली सापडून पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; भुकूम येथील घटना

Accident News : दिघीबंदर महामार्गावर भुकूम हद्दीतील हॉटेल गारवा समोर भरधाव वेगात असलेल्या डंपर खाली सापडून पती-पत्नीचा जागेवरच दुर्देवी अंत झाला असून हि घटना गुरूवार (दि. १२) रोजी रात्री १ वाजता घडली आहे. यामध्ये अनिल काळु सुर्यवंशी आणि प्रिया अनिल सुर्यवंशी (रा.लवळे फाटा पिरंगुट ता मुळशी) यांचा जागेवरच दुर्देवी अंत झाला आहे. अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी अभिजित दत्तात्रय तरवडे यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया सुर्यवंशी या बुधवार (दि.११) रोजी मैत्रिणीबरोबर पुण्यात गणपती बघायला गेल्या होत्या. त्या रात्री भुगांव येथे आल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांचे पती अनिल हे लवळे फाटा येथून भुगावला आले होते. प्रिया यांना अनिल दुचाकी ( एमएच १२ टिएक्स ०३९५ ) वर घेऊन लवळे फाट्याकडे जात असताना राञी एक वाजता भुकूमकडून भुगावकडे निघालेल्या डंपर (नंबर एमएच १४ एलजी ७९११ ) ने हॉटेल गारवा समोर जोरदार धडक दिली.
यामध्ये अनिल आणि प्रिया यांच्या डोक्यातून रक्ताचे रस्त्यावरून अक्षरशः पाट वाहत होते. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते.
अनिल आणि प्रिया यांचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. अनिल हे उरवडे रोडवरील एका कंपनीत तर प्रिया या भुगावला एका दुकानात कामाला होते. दोघांच्या मनमिळावू स्वभावामुळे झालेल्या आपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत.
या मार्गावर अनेक अपघात होत आहेत. अनेकांना येथे जीव गमवावे लागले आहे. या मार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत. या मार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून सबंधित विभाग कोणतीही दक्षता घेत नाही, येथील स्थानिक मुळशी संघर्ष समिती यांनी अनेक आंदोलने केली. तरीही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.





