Pune Gramin : नसरापूर परिसरात अपघात; ऐन दिवाळीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

नसरापूर : दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फुले घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्याच्या पॅगो (थ्री व्हीलर) वाहनाचा आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नसरापूर येथील शिवगंगा नदी परिसरात पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाल्याने शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान झाले.
ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या मेहनतीने तयार केलेले भाजीपाला व फुलांच्या गठ्ठ्यांसह पुणे बाजारपेठेकडे रवाना झाला होता. मात्र, नसरापूर-वेल्हे मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनाचा तोल जाऊन ते पलटी झाले. यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी शेतकऱ्याचे सर्व सामान आणि फुलांचे गठ्ठे पूर्णपणे नष्ट झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतीसाठी प्रयत्न केले. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये व वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत “या रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत, तरीही प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवगंगा नदी परिसर ते नसरापूर या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून, वारंवार माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीही दुरुस्तीचे काम होत नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, “आम्हाला सण नाही, सुरक्षित रस्ता हवा,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.





