Lalbagh accident : लालबाग परिसरात अपघाताची घटना! २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू; घटनेत ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Lalbagh accident : आज सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईतही सकाळपासून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर गणेश विसर्जनसाठी लोकांची गर्दी झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मोठ्या संख्येने या मिरवणुकीत गणेश भक्त सहभागी झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लालबाग परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर २ वर्षांच्या चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर या घटनेत ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.
ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. अज्ञान व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेने आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.





