निमगाव सावात गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; कुकडी नदीत तरुण बुडाला, शोध सुरू

बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे गणपती विसर्जनादरम्यान एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (6 सप्टेंबर ) दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या सुमारास अशोक खंडू गाडगे (वय 23) हा तरुण कुकडी नदीत गणपती विसर्जनासाठी उतरला असता पाण्यात बुडाला.
मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चार जण नदीच्या पात्रात उतरले होते. यापैकी तीन जण बाहेर आले, परंतु अशोक गाडगे बेपत्ता झाला आहे. गेल्या दीड तासांपासून स्थानिक आणि प्रशासनाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली असून स्थानिक गावातील समाजाचे युवक त्याचा पाण्यामध्ये शोध घेत आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या एनडीआरएफ पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले असल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले.




