पवारांच्या बालेकिल्ल्यात महाजनादेश यात्रेचा प्रवेश

दौंड तालुक्यासाठी मुख्यमंत्री काय बोलणार याकडे नागरिकांचे लक्ष; सरसकट कर्जमाफीची मागणी
वासुंदे – भाजप सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली महाजनादेश यात्रा शनिवार (दि. 14) पवारांच्या बालेकिल्ल्यात येत आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे मुख्यमंत्र्यांची सभा होत असून गेले तीन वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या येथील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह मुख्यमंत्री अजून काय ठोस आश्वासन देतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यातच बड्या राजकीय नेत्यांची “आउटगोइंग’ सुरू असल्यामुळे राजकीय वातावरण तापत चालले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या हर्षवर्धन पाटलांनी भाजप प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद तोडीस तोड झाली असून मुख्यमंत्र्यांनी येथील शेतकऱ्यांच्या भावना ओळखून ठोस भूमिका घेतल्यास याचा निश्चितच फायदा भारतीय जनता पार्टीला होईल, असे गाव पारावर बोलले जात आहे
धनगर आरक्षणाच्या घोषणेकडे लक्ष
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील बांधव अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, म्हणून लढा देत आहेत. आघाडी सरकारच्या काळात बारामती तालुक्यात फार मोठे जनआंदोलन झाले. या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले होते. याच आंदोलनाला भाजपने “हायजॅक’ करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असल्याचे जाहीर केले होते. सद्यःस्थितीत पाच वर्ष उलटूनदेखील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आदिवासी समाजाला मिळणाऱ्या काही सवलती धनगर समाजाला लागू करून बोळवण करण्यात आली असली तरी त्या सवलती नेमक्या कोणत्या आणि कशा राबवल्या जाणार, याबाबत धनगर समाजात संभ्रमावस्था आहे. भाजपची महाजनादेश यात्रा शनिवार (दि. 14) दौंड तालुक्यात दाखल होत असून, वरवंड येथे होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणादृष्टीने काही सकारात्मक घोषणा करणार का, याकडे धनगर बांधवांचे लक्ष लागले आहे.
टाटाचा पाणीप्रश्नाचे आव्हान कायम
लोकसभा निवडणुकीत सुपे येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी दौंड, बारामती, इंदापूरच्या जिरायत भागातील पाणी प्रश्नावर सकारात्मक सूतोवाच केले होते. तुम्ही कांचन कुल यांना निवडून द्या, टाटाचं काय करायचं ते मी बघतो, असे बोलून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात त्यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र कांचन कुल यांचा पराभव झाल्यामुळे आता या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात किंवा त्यांच्या पुढील योजना काय असणार, याकडे दौंड तालुक्यातील जनतेला उत्सुकता आहे.
औद्योगिक नंदनवनाची प्रतीक्षा
नवीन औद्योगिक वसाहत, नवउद्योग रोजगार निर्मिती होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असून जिरायत भागात हजारो एकर जमिनी पडीकच आहेत. या जमिनींना पाण्याची उपलब्धता होऊन शेती होणे शक्य नाही, त्यामुळे या पडीक माळरानावर औद्योगिक नंदनवन उभारल्यास या भागाला चांगले दिवस येतील.
याकडे लक्ष वेधणार
नगर-बारामती महामार्गामधील कुरकुंभ, जिरेगाव, वासुंदे परिसरातील रखडलेला महामार्ग
पालखी पालखी महामार्ग सुरू कधी होणार?
अष्टविनायक महामार्गा संदर्भाचे धोरण
तालुक्यातील नदीकाठची बारमाही बागायती शेती पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे आठमाही बागायती होणे
जिरायत भागातील शेती दुष्काळने होरपळतेय
कुरकुभं औद्योगिक वसाहतीतील वारंवार होणाऱ्या दुर्घटना





