पुणे जिल्हा | लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्ष जाळ्यात

बेल्हे, (वार्ताहर) – लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी जुन्नर कृषी अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षकास चार हजारांची लाच स्वीकारताना पुणे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) करण्यात आली आहे. बापू एकनाथ रोकडे (वय 57) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.
जुन्नर तालुक्यातील 52 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला होता. हे शासकीय अनुदान मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली आहे. ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार बापू रोडके यांना भेटले.
त्यावेळी रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता रोकडेने तक्रारदार यांच्याकडे ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली.
तसेच तडजोडी अंती चार हजार रुपये लाच मागून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. आरोपीवर जुन्नर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.





