पुणे जिल्हा | कर्करोगतज्ञ डॉ. अमोल डुंबरे यांना दुसर्यांदा आयर्नमॅन किताब

बेल्हे, (वार्ताहर) – इटली येथे 21 सप्टेंबर रोजी ’आयर्न मॅन ट्रायोथलॉन’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. अमोल डुंबरे यांनी हा किताब पटकवला आहे.
जगातील एक दिवसीय स्पर्धामधील अतिशय खडतर स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये जगभरातली विविध देशातील 3000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकाचा शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.
यात 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे व 42 किलोमीटर पळणे हे सलग न थांबता करायचे असते. तसेच हे सर्व 16 तासांच्या आत पूर्ण करायचे असते.
डॉ. अमोल डुंबरे यांनी हे आव्हान 15 तास 13 मिनिटांमध्ये पूर्ण केले. यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. अमोल डुंबरे यांनी कठोर परिश्रम व मेहनत केली होती. हॉस्पिटलमधील व्याप सांभाळून खडतर स्पर्धेची तयारी करणे व आयर्नमॅन किताब मिळवणे निशीतच कौतुकास्पद आहे.
या आधी 5 मार्च 2022 रोजी दुबई येथे पार पडलेल्या ’आयर्न मॅन 70.3’ या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये 125 देशांचे 2500 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मध्ये ही ’आयर्नमॅन’ ही स्पर्धा पूर्ण करणारे डॉ. अमोल डुंबरे हे पुणे जिल्ह्यातील पहिले कॅन्सरतज्ञ व जुन्नर तालुक्यातील पहिलेच व्यक्ती ठरले होते.





