nagar | ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करा

नगर, (प्रतिनिधी) – ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची भाजपचे पराभूत उमेदवार मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांनी विखे यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करा, असा सल्ला त्यांना दिला आहे.
माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत श्रीगोंदे येथील १०, पारनेर १०, नगर, शेवगांव-पाथर्डी व कर्जत-जामखेड, व राहुरी येथील प्रत्येकी ५ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हिव्हिपॅटपडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
डॉ. विखे यांच्या या मागणीनंतर खा. नीलेश लंके यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर न फोडता पराभव मान्य करा, असा सल्ला माध्यमांशी बोलताना दिला.
यावेळी लंके म्हणाले, माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणूका पाहिल्या. जिल्हा, राज्य व केंद्र स्तरीय निवडणूका मी हाताळल्या असून त्या पारदर्शीपणे पार पडल्याचा माझा अनुभव आहे.
नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला. प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने नजरेखालून घातली. चार चार वेळा प्रत्येक आकडे तपासण्यात आले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हिव्हिपॅट मशिन मधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. त्यात कोठेही फरक आढळून आलेला नाही. त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलेली मागणी चुकीची असल्याचे लंके यांनी सांगितले





