पुणे पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग

राज्याच्या पथकाने केली जागेची पाहणी
पुणे – महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि टीचिंग हॉस्पिटलच्या कामाला आणखी गती आली आहे. संचालनालयाकडून यासाठी बी.जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांची समिती नेमली असून या पथकाने आज याकामी पाहणी केली.
यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी समिती सदस्यांना आवश्यक बाबींची माहिती दिली. या पथकाने महाविद्यालयाची जागा असलेले डॉ. नायडू सांसर्गिक हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल तसेच सणस मैदान येथील वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी या जागांबाबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तपासणीही या पथकाने केली.
दरम्यान, या पथकाने महापालिकेने तातडीने महाविद्यालयासाठी आवश्यक कर्मचारी भरती करण्याच्या सूचना पालिकेस केल्या आहेत.
डॉ. भारती…, तात्पुरते डीन ?
वैद्यकीय महाविद्यालयासाठी महापालिकेने ट्रस्ट स्थापन केला असला तरी, महाविद्यालयाच्या मान्यतेच्या पत्रव्यवहारांसाठी महाविद्यालयास डीन असणे आवश्यक आहे, त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भारती यांची डीन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यासाठी त्यांच्याकडे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून जबाबदारी देण्यात येणार असून त्यांच्या नावानेच सर्व पत्रव्यवहार होणार आहे.



