महापालिका प्रशासन : कामगारांना मिळाला दिलासा
पिंपळे गुरव – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय तसेच विकासकामे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. परंतु शासनाने लॉकडाऊनमधील काही अटी शिथिल करून नियमांचे पालन करत उद्योगधंदे, व्यापार व विकासकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना करोनामुळे खिळ बसली होती ती निघाल्याने पुन्हा एकदा विकासकामांनी गती घेतली आहे. त्यामुळे कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या एक-दीड महिन्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे विकासकामे बंद पडली होती. त्यामुळे मजूर, कामगार नागरिकांपुढे खूप मोठा पेच निर्माण झाला होता. उदरनिर्वाहाचे साधन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. परंतु लॉकडाऊनमधील अटी शिथिल करण्यात आल्याने शासन नियमानुसार व आदेशानुसार परवानगी घेऊन अनेक उद्योगधंदे, व्यापार, विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे बेरोजगार कामगारांना दिलासा मिळाला आहे. बेरोजगार झालेल्या कामगारांना सतत कामधंदा कधी सुरू होणार, कधी उपासमार थांबणार, लॉकडाऊन कधी उठणार असे असंख्य प्रश्नांनी मनात घर केले होते. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामांना परवानगी दिली आहे.
त्यानुसार विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे गावी परतणाऱ्या मजुरांना दिलासा मिळाला आहे. विकासकामे ठप्प असल्याने परप्रांतीय मजुरांसह मराठवाडा व विदर्भातील मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यांना गावी परतण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी शहराच्या विकासात नागरिकांचे असलेले योगदान व या मजुरांच्या दृष्टीने सकारात्मक विचार करत स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे मजुरांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटून स्थानिक नागरिकांना या अर्धवट कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यातून आता त्यांची सुटका होणार आहे.
पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत “एरिया बेस डेव्हल्पमेंट’मध्ये डीपी रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व जमिनी खालून जाणाऱ्या पिण्याचे पाण्याची पाइपलाइन, सांडपाणी व पावसाळी पाण्याच्या वाहिन्या निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. या परिसरात बहुतांश डीपी रस्ते जेसीपीच्या साहाय्याने खोदले होते. हे रस्ते तयार करण्यासाठी वेळ लागणार होता. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होती. त्यातच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित केल्याने रस्त्यांची कामे अर्धवट राहिली. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होणार होता. परंतु त्यातून आता शहरवासीयांची सुटका होणार आहे.
अपूर्ण कामाचा नागरिकांना त्रास
पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील अनेक रस्ते खोदले आहेत. बऱ्याच रस्त्यांचे काम प्रगतिपथावर होते. परंतु अचानक करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सर्व कामधंदे बंद पडले. कामगारांवर उपासमार आली. परंतु ही विकासकामे पावसाळ्यापूर्वी झाली नाहीत तर स्थानिक नागरिकांना, वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत विकासकामे करण्यासाठी ठेकेदारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे परगावी जाणाऱ्या कामगारांना रोजगार मिळाला आहे. विकासकामे पूर्ण झाल्यास नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून ठेकेदार व त्यांचे कामगार काम करणार आहेत. सध्या काही तास सोडले तर रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ, वाहतूक नसल्याने याचा फायदा काम करणाऱ्या ठेकेदारांना होणार आहे. जास्तीत जास्त काम मशिनच्या माध्यमातून केले जाईल. जर आता काम सुरू केले नसते तर मजूर आपापल्या गावी परतण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे दिवाळीपर्यंत कामे सुरू करणे अवघड झाले असते. याचा परिणाम पावसाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका बसला असता.
– विजय भोजने, स्मार्ट सिटी प्रवक्ता