बाणेर-बालेवाडीला मुबलक पाणी; जलवाहिनीचे काम 98 टक्के पूर्ण

पुणे – केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पॅन सिटीचा भाग म्हणून निवड करण्यात आलेल्या बाणेर-बालेवाडीसाठी महापालिकेकडून यंदाच्या उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 23 किलोमीटरची ट्रान्समिशन लाइन टाकण्याचे तब्बल 22.500 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील 10 दिवसांत उर्वरीत 500 मीटरचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे, या भागातील तब्बल 5 ते 7 लाख नागरिकांना टॅंकरपासून मुक्ती मिळणार आहे.
चांदणी चौक, डुक्कर खिंड आणि सूस खिंडीच्या जवळ हे काम शिल्लक असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात बालेवाडी तर त्यानंतर पुढील आठवडाभरात बाणेर भागाची समस्या सुटणार आहे. बाणेर-बालेवाडी गावांतील पाण्यासाठी तब्बल 23 किलोमीटरच्या महत्वाच्या जलवाहीन्या टाकण्याचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी महामार्गात हे काम असल्याने तसेच काही भागात नदी ओलांडून काम करायचे असल्याने अनेक अडचणी होत्या. मात्र, हे काम अखेर पूर्ण झाले असून मे अखेरीस या भागातील पाणी समस्या सुटलेली असेल.
“या भागातील पाण्यासाठी मी स्वत: न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाण्याच्या टाक्या, महामार्गाच्या बाजूने जलवाहिनीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे, या भागातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची पाण्याची समस्या कायमची संपणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून याचे समाधान आहे,” असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.
पाण्याचा उलटा प्रवास थांबणार…
बाणेर-बालेवाडी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी यापूर्वी महापालिका वारजे जलकेंद्रातून चांदणी चौकातील टाकीत पाणी सोडत होती. तेथून हे पाणी पाषाण टाकीला जात होते. त्यानंतर पाषाण येथून हे पाणी सूस पाण्याच्या टाकीवर जाऊन नंतर पॅनकार्ड क्लब (बालेवाडी) व पाच लाख लिटरच्या टाकीत जायचे, त्यानंतर या पाण्याचे वितरण व्हायचे.
मात्र, आता पालिकेने चांदणी चौकातच ब्रेक प्रेशर टॅंक उभारला असून या ठिकाणाहून पाणी आता थेट पुणे-बेंगलोर महामार्गाच्या बाजूने गुरूत्वाकर्षनाद्वारे बाणेर-बालेवाडीत उभारण्यात आलेल्या तीन टाक्यांमध्ये जाईल. या टक्यांची क्षमता तब्बल 1 कोटी 15 लाख लीटर आहे. यातून बाणेर-बालेवाडीसाठीचा पाण्याचा उलटा प्रवास थांबणार आहे.





