Abu Azmi : आझमींचे वक्तव्य हे दुफळी निर्माण करणारे; अल्पसंख्यांक आयोगाने दिला कारवाईचा इशारा

नागपूर : अल्पसंख्यांक आयोगाने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले असून वारी निघाली असताना, असे वक्तव्य करणे म्हणजे समाजात दुफळी निर्माण करणे होय. हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगल उसळवण्यासाठी अशाप्रकारे प्रक्षोभक वक्तव्य करणे गैर आहे, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हटले आहे. ते सोमवारी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्रमक पवित्रा घेत अबू आझमींना सेक्शन १० प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. अबू आझमी यांचे वारी संदर्भातला वक्तव्य अवाजवी असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमी यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस ही बजावणार आहे. शिवाय गरज भासली तर त्यांना आयोगासमक्ष उपस्थित राहून उत्तर देण्यासही सांगू, असेही अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले. जर अबू आजमी यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली, तर जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले.





