Abhishek Sharma Records : अभिषेक शर्माच्या बॅटची त्सुनामी! सेहवागसह गेल-पूरनला टाकत रचला इतिहास; लावली विक्रमांची रांग
Abhishek Sharma Records : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ५९ धावांची झंझावाती खेळी करत अभिषेक शर्माने अनेक विक्रमांची रांग लावली

Abhishek Sharma Records IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या बॅटने अक्षरशः आग ओकली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ५९ धावांची झंझावाती खेळी करत अभिषेकने केवळ संघाला मजबूत सुरुवात करून दिली नाही, तर भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला आहे.
अभिषेक शर्माने ऐतिहासिक कामगिरी –
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चेन्नईविरुद्ध खेळताना अभिषेक शर्माने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत ७५ धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान अभिषेकने आयपीएल कारकिर्दीतील २००० धावांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे, हा टप्पा गाठण्यासाठी त्याने सर्वात कमी चेंडूंचा सामना केला असून, वीरेंद्र सहवागचा कित्येक वर्षांचा विक्रम आता इतिहासजमा झाला आहे.
ABHISHEK SHARMA DESTROYS CSK IN POWERPLAY 🔥💛
Abhishek Sharma smokes a 15-ball fifty with a lethal 333.33 strike rate.🥶
– He reached the milestone smashing 4 sixes and 5 fours, proving why the “Travishek” storm is unstoppable! 🤯pic.twitter.com/33f1KCHkhn
— Sam (@Cricsam01) April 18, 2026
सेहवागचा विक्रम मोडीत, रसेलच्या पावलावर पाऊल –
अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ११९३ चेंडू घेतले. यापूर्वी वीरेंद्र सहवाग यांनी १२११ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता. जागतिक स्तरावर विचार केल्यास, अभिषेक आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल (११२० चेंडू) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अभिषेकने या विक्रमासोबतच निकोलस पूरन (११९८ चेंडू) आणि ख्रिस गेल (१२५१ चेंडू) यांसारख्या स्फोटक फलंदाजांनाही मागे टाकले आहे.
२० चेंडूंच्या आत ६ वेळा ‘अर्धशतक’ –
अभिषेक शर्माच्या नावावर आता आणखी एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. आयपीएल इतिहासात २० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत ६ वेळा अर्धशतक ठोकणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. या यादीत वैभव सूर्यवंशी, ट्रॅव्हिस हेड आणि निकोलस पूरन (प्रत्येकी ३ वेळा) खूप मागे आहेत. तसेच, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही बलाढ्य संघांविरुद्ध २० पेक्षा कमी चेंडूंत अर्धशतक ठोकणारा तो इतिहासातील एकमेव फलंदाज ठरला आहे.





