Abhishek Banerjee : 20 खासदारांना मतदानापासून रोखावे; तृणमूल काॅंग्रेसची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विनंती केली आहे की, ज्या २० खासदारांनी नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरणाचा दावा केला आहे, त्यांना संसदेच्या आगामी अधिवेशनात मतदान करू देऊ नये. या खासदारांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे.

Abhishek Banerjee : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विनंती केली आहे की, ज्या २० खासदारांनी नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरणाचा दावा केला आहे, त्यांना संसदेच्या आगामी अधिवेशनात मतदान करू देऊ नये. या खासदारांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे.
२८ नोव्हेंबर रोजी बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी म्हटले आहे की, तृणमूल काॅंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या या खासदारांना, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत, विशेष अधिवेशनात मतदानामध्ये सहभागी होऊ देऊ नये. संबंधित २० सदस्यांना विशेष अधिवेशनात मतदानामध्ये सहभागी होण्याची परवानगी देऊ नये, कारण त्यांच्या अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
बॅनर्जी यांनी एनसीपीआयमध्ये विलीनीकरणाचा दावा करणाऱ्या या २० खासदारांसाठी केलेल्या स्वतंत्र आसनव्यवस्थेचाही तातडीने आढावा घेण्याची मागणी केली आहे. या सर्व २० खासदारांविरुद्ध १९ जून रोजी राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची आणि लोकसभा सदस्य (पक्षबदलाच्या आधारावर अपात्रता) नियम, १९८५ अंतर्गत अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्या अद्याप अनिर्णित आहेत.
बॅनर्जी यांनी इशारा दिला की, याचिका निकाली निघण्यापूर्वी या खासदारांना मतदान करू दिल्यास, प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो; कारण अशा विधेयकासाठी उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.
लोकसभेच्या अधिकृत वेबसाइटवर तृणमूल काॅंग्रेसची सदस्यसंख्या अजूनही २८ दाखवली जात आहे, ज्यामध्ये एनसीपीआयमध्ये विलीनीकरणाचा दावा करणारे ते २० खासदारही समाविष्ट आहेत. दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी असा युक्तिवाद केला की, निवडून आलेला सदस्य ज्या राजकीय पक्षाने त्याला उमेदवार म्हणून उभे केले होते, त्याच पक्षाचा सदस्य मानला जातो.
दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद ४ अंतर्गत अपात्रतेतून मिळणारी सवलत तेव्हाच लागू होते, जेव्हा मूळ राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होतो. टीएमसीचे एनसीपीआयमध्ये विलीनीकरण झालेले नाही. बॅनर्जी यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या २० खासदारांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असे निदर्शनास आणून दिले की, संसदीय नोंदींमध्ये ते अजूनही टीएमसीचे सदस्य म्हणूनच सूचीबद्ध आहेत.
ही घडामोड अशा वेळी घडली आहे, जेव्हा टीएमसीने आपल्या सर्व लोकसभा खासदारांसाठी एक ‘थ्री-लाइन व्हिप’ जारी केला आहे. यामध्ये त्यांना ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सभागृहात उपस्थित राहण्याचे आणि पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश (Abhishek Banerjee) देण्यात आले आहेत.






