Abhijit Dipke : मोठी बातमी! ‘स्कूल ठीक करो’ अभियान अभिजीत दिपकेंना भोवलं; शाळेत अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा
Abhijit Dipke : ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांची पाहणी करणारे 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Abhijit Dipke : ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत शाळांची पाहणी करणारे कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके अडचणीत आले आहेत. औसा येथील जिल्हा परिषद प्रशाला विभाग उर्दू या शाळेत कथितपणे अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण केल्याप्रकरणी दिपकेंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Abhijit Dipke)
शाळेत प्रवेश करून चित्रीकरण केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अभिजीत दिपके हे अजिंक्य शिंदे आणि अन्य काही व्यक्तींसोबत शाळेत गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारल्याने शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच शाळेची पूर्वपरवानगी न घेता चित्रीकरण करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचाही आरोप आहे. (Abhijit Dipke)
शिक्षकांना धमकी आणि अपशब्द वापरल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, दिपके यांनी शिक्षकांना अपशब्द वापरल्याचा तसेच त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय शाळेत विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून बसवण्यात आल्याचा दावा करून शाळेची बदनामी केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. (Abhijit Dipke)
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी सय्यद समशादबानो खैरातअली यांच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 132, 329(3), 351(2), 356(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड करत आहेत. (Abhijit Dipke)
दिपकेंचा नेमका दावा काय होता?
दरम्यान, ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या पाहणीदरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत खासगी शाळेचे विद्यार्थी आढळल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला होता. (Abhijit Dipke)
विद्यार्थ्यांसमोरच याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचं सांगितल्याचा दावा दिपकेंनी केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात खासगी शाळेचे विद्यार्थी कसे आणि कोणाच्या परवानगीने आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. (Abhijit Dipke)
याच पाहणीदरम्यान केलेल्या कथित अनधिकृत प्रवेश आणि चित्रीकरणावरून आता दिपके यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ‘स्कूल ठीक करो’ अभियानावरून सुरू झालेला हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. (Abhijit Dipke)






