Education System : मंत्र्यांच्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश ? अभिजीत दीपके यांची मोठी मागणी
Education System : मंत्र्यांसह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुलांना सरकारी शाळांत शिकवावे, अशी मागणी अभिजीत दीपके यांनी केली. त्यांच्या मूळ गावातील शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली.

Education System : मंत्री, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्येच शिकवावे, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली आहे.
सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सवाल करत, स्वतःच्या व्यवस्थेवर विश्वास असेल तर मुलांना खासगी शाळांऐवजी सरकारी शाळांत का शिकवले जात नाही, असा टोला लगावला.
सरकारी शाळांच्या सुधारणेसाठी सुरू असलेल्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर दीपके यांनी मंगळवारी ही मागणी केली. शिक्षण विभागाशी संबंधित सर्वांनी आपल्या मुलांचे प्रवेश सरकारी शाळांत करून घेतल्यास या शाळांच्या सुविधा आणि गुणवत्तेत वेगाने सुधारणा होऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, दीपके यांच्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील सुविधांचा प्रश्न त्यांच्या पाहणीनंतर ऐरणीवर आला आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या सुरुवातीसाठी ते १५ ऑगस्ट रोजी गावातील शाळेत गेले होते. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर त्यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी वर्गखोल्यांच्या तुटलेल्या खिडक्यांच्या काचा तसेच अन्य मूलभूत सुविधांची कमतरता त्यांच्या निदर्शनास आली.
दीपके यांच्या पाहणीनंतर ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. सरपंच विजय पुरी यांनी सांगितले की, शाळेतील खराब खिडक्यांचे फ्रेम बदलण्याचे काम सुरू असून बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवले जात आहेत.
शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची कमतरता असल्याचेही निदर्शनास आले होते. आता स्वच्छतागृहांसाठी २४ तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला मूलभूत सुविधांची दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.





