Abhijit Dapke: “वेळ आल्यास तुरुंगात जाईन”; नीट पेपरफुटीवर अभिजीत दिपके यांची आक्रमक भूमिका
Abhijit Dapke: NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर टीका करत दापके यांचा हल्लाबोल; पुणे विद्यापीठाने आंदोलनाला दिली अधिकृत परवानगी.

Abhijit Dapke – नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात वेळ आल्यास तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी)संस्थापक अभिजीत दिपके यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सीजेपीतर्फे गुरुवारी पुणे विद्यापीठात आंदोलन होणार असून त्याला विद्यापीठाने परवानगी दिली आहे. पुण्यानंतर जयपूर, अमृतसर, लखनऊ आणि बंगळुरू येथे आंदोलन करणार असल्याचे दिपके यांनी सांगितले.
नीट परीक्षेतील पेपरफुटी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (एनटीए) गलथांग कारभाराबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून दापके म्हणाले, तरुणांनी न घाबरता आपली भूमिका मांडली पाहिजे. पालकांनीही त्यांना बोलण्यापासून रोखू नये. एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबता येऊ शकतो; मात्र लाखो विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया- युक्रेन युद्ध थांबवू शकतात. तसचे ते शिक्षणमंत्र्यांचा राजीनामादेखील घेऊ शकतात.
दिल्ली आंदोलनाचे कोणालाही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही देशभरातून विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले. विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले तर स्वतंत्र आंदोलनाची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आंदोलनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्याचे स्वागतच असेल, असेही दिपके यांनी स्पष्ट केले.





