Pimpri : अभंग स्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा

देहूगाव : येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवार (दि.१४) ते सोमवार (दि.१६) या कालावधीत क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. यात ५० मीटर व १०० मीटर धावणे, तीन पायांची शर्यत, अडथळा शर्यत, रस्सीखेच इत्यादी स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या पार पडल्या.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक संजीव पवार व प्रा. धन्यकुमार उपाध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी एइएमएस ही शाळेच्या अद्याक्षरांची निर्मिती करीत उपस्थितांची दाद मिळविली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांनुसार ड्रील व शर्यतींचे सादरीकरण केले.
अग्नी, जल, पृथ्वी, वायू या चारही संघांमध्ये विविध खेळांचे सामने आयोजित केले होते. क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट संघ म्हणून पृथ्वी संघाला गौरविण्यात आले. रणवीर चव्हाण आणि ऐश्वर्या कवडे यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी उपस्थित होत्या.
क्रीडा शिक्षक अश्रफ शेख, मायकेल डेविड, प्रतिक पांचाळ व सीमा भोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खेळांचे उत्तम प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा गावडे, अस्मिता शिरालकर, प्रज्ञा मेहेर व पूनम ढाकोळ यांनी केले. तर क्रीडा शिक्षक अश्रफ शेख यांनी आभारप्रदर्शन केले.





