अब्दुल सत्तारांनी केला मोठा दावा; म्हणाले,”आणखी पाच आमदार आणि २-३ खासदार शिंदे गटात येणार”

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारा दावा केला आहे. सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना “आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता, सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचे निवेदनही स्वीकारले. अब्दुल सत्तार भाषणात म्हणाले, “आम्ही ४० आमदार अधिक दहा, त्यात पाच आमदार आणखी येणार आहेत. पहिले दहा खासदार होते नंतर १२ खासदार झाले आता १३ झाले. दोन-तीन आणखी येणार आहेत. तरी हे लोक असली-नकली असं सांगताय, मग हे येणारे काय वेडे आहेत का? आता गल्ली-बोळात फिरत आहेत, अगोदरच फिरले असते तरी ही वेळ आली असती का?”असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
याशिवाय “हे कशामुळे झालं, घरात बसल्यामुळे झालं. आज तुमची मैदानात उतरण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवण्याचे स्वप्न पाहत आहात, मग अडीच वर्षे काय केलं? मुख्यमंत्री हे छोट पद नाही, तो किती मोठी किती शक्तीशाली असतो याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी होता त्यावेळी काही दिलं नाही, आता नाहीत तर काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही.” असेही सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बोलून दाखवले.





