पुणे – शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार आणि आमदार अशोकराव पवार यांच्या मुलाचे शनिवारी दुपारी अपहरण करण्यात आले. मुलाचे अपहरण केल्यावर त्याची एका महिलेसोबत अश्लिल व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली. ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत दहा कोटीची खंडणी मागण्यात आली. ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत ही घटना घडल्याने शिरुर तालूक्यात खळबळ माजली आहे. यासंदर्भात ॲड. असिम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी अशोकराव पवार यांची मुलगी उपस्थित होती. तर अशोकराव पवार आणि त्यांच्या मुलाने व्हिडिओ कॉलव्दारे संवाद साधला. याप्रकरणी शिरुर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एफआयआर दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. ॲड.सरादे म्हणाले की, निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात, तर चांगल्या आणि वाईट कामांचे मुल्यमापन होत असते. मात्र, आज अशोकराव पवार यांच्या मुलावर जो प्रसंग उद्भवला तो अतिशय वाईट आहे. यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ऋषीराज हा तीस वर्षाचा असून त्यांचाच एक कार्यकर्ता भाऊ कोळपे याने एका चांगल्या ठिकाणी मिटींग लावायची आहे, असे सांगत मांडवगाव फराटा येथील एका बंगल्यात नेऊन हात-पाय बांधून मारहाण केली. यानंतर त्याला विवस्त्र केले, तसेच एका महिलेला आणून तीला कपडे काढायला लावून ऋषीराज सोबत तिची छायाचित्र आणि व्हिडिओ शुट केले. हे व्हिडिओ तुमच्या विरुध्द निवडणूक लढवणारे संपर्कात आहेत. ते आम्हाला पैसे देणार आहेत. तुम्ही दहा कोटी दिले तर आम्ही ते देणार नाही. यामुळे घाबरलेल्या ऋषीकेशने पैसे देऊ असे सांगत कशी बशी स्वत:ची सुटका केली. यानंतर कार्यकर्त्यांच्या मदतीने भाऊ कोळपे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कोळपे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.