पिंपरी- एका महिलेला रस्त्यात गाठून रिलेशन ठेवण्याची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 28) एमआयडीसी, भोसरी येथे घडली. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र नागनाथ कांबळे (वय 34, रा. रोडे हॉस्पिटल शेजारी, दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि. 29) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 21 डिसेंबर 2020 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामचंद्र याने फिर्यादी महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. चाकूचा धाक दाखवून फिर्यादीस त्यांच्याशी रिलेशन ठेव, असे सांगितले. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. नाशिक फाटा रोड येथे दुचाकीवरून ढकलून देऊन तिचा हात फॅक्चर केला. तसेच फिर्यादी महिलेची बदनामी करून तिला धमकी दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल ढेरे तपास करीत आहेत.