मुंबई : आम आदमी पार्टीने (आप) मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये केजरीवाल की गॅरंटी या नावाने मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्यसेवा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपने २२७ सदस्य असलेल्या मुंबईसाठी ७५ उमेदवार उभे केले आहेत. केजरीवाल की गॅरंटी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी आरोप केला की, ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असूनही बीएमसी मूलभूत सेवा पुरवण्यात अयशस्वी ठरली आहे. दिल्ली आणि पंजाबमधील आपच्या प्रशासकीय मॉडेलची मुंबईत अंमलबजावणी करून मोफत वीज, दर्जेदार शिक्षण आणि सुलभ आरोग्यसेवा पुरवली जाईल. या जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत पाणीपुरवठ्यासह २४x७ स्वच्छ पिण्याचे पाणी, आधुनिक पायाभूत सुविधांसह बीएमसी-संचालित शाळांचे आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाने संपूर्ण मुंबईत १,००० मोहल्ला क्लिनिक स्थापन करण्याची योजनाही जाहीर केली आहे, जिथे मोफत सल्ला, औषधे आणि निदान चाचण्या उपलब्ध असतील. मोहल्ला क्लिनिक ही आपने दिल्लीत सत्तेत असताना सुरू केलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, जी मोफत मूलभूत वैद्यकीय सेवा पुरवतात.