आमदाराचा गोळी लागून संशयास्पद मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

AAP MLA Gurpreet Bassi Gogi Dies: पंजाबच्या लुधियाना वेस्टचे आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. गोळी गोगी यांच्या डोक्याला लागली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही गोळी कोणी व कशा पद्धतीने चालवली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळी लागल्यानंतर त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आम आदमी पक्षाचे जिल्हा सचिव परमवीर सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, आमदार गुरप्रीत बस्सी गोगी हे नियोजित कार्यक्रम संपवून घरी परतत होते. यावेळी त्यांचे कुटुंब देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी गोगी यांच्या पत्नीने अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला व त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांकडून आता या घटनेचा तपास केला जात आहे. गोळी कोणी चालवली व यामागे नक्की कारण काय होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
कोण आहेत गुरप्रीत बस्सी गोगी?
गुरप्रीत बस्सी गोगी हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आपच्या चिन्हावर पंजाबच्या लुधियाना वेस्ट मतदारसंघातून निवडून आले. त्याआधी ते काँग्रेस पक्षात होते. ते काँग्रेस जिल्हा (शहर) अध्यक्षही होते. आमदार होण्याआधी ते दोनवेळा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते.
2022 मध्ये आपमध्ये प्रवेश करत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या भारत भूषण आशु यांचा पराभव केला होता.





