Yogi Adityanath : आप पक्ष म्हणजे खोटं बोलण्याचे ‘एटीएम’; योगी आदित्यनाथ यांची केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष हा खोटं बोलण्याचे एटीएम मशीन असल्याची टिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी प्रचार सभेत केली. तसेच केजरीवाल यांनी आपले गुरू अण्णा हजारे यांचा विश्वासघात केला. जो गुरूंचा विश्वासघात करू शकतो तो जनतेचाही विश्वासघात करेल, अशा प्रखर शब्दांत केजरीवाल यांना खडेबोल सुनावले.
योगी म्हणाले की, दिल्लीत मूलभूत सुविधा नाहीत. आम आदमी पक्षाने दिल्लीचे चित्र कुरूप केले आहे. आता त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार नाही. जर आपण मुख्यमंत्री या नात्याने आणि संपूर्ण मंत्रिमंडळ संगममध्ये स्नान करू शकतो, तर मी केजरीवालजींना विचारतो की ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करू शकतात का? केजरीवाल यांनी यमुनेला घाण नाल्यात रुपांतरीत केले आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. किरारीतील भाजपचे विधानसभा उमेदवार बजरंग शुक्ला यांच्या समर्थनार्थ त्यांनी गुरुवारी जाहीर सभेला संबोधित केले.
दिल्लीमध्ये कचराच कचरा
आज मी स्वतः पाहतोय की रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे. तुम्ही एका व्यक्तीला आणि त्याच्या साथीदारांना ही सूट का दिली? दिल्लीत सर्वत्र कचरा इतका साचला आहे की संपूर्ण राजधानीची दयनीय अवस्था झाली आहे. आज आमच्या वाहनांना इथल्या त्याच गटाराच्या पाण्यातून जावे लागले. आजकाल केजरीवाल आपल्या भाषणातून वारंवार यूपीची चर्चा करत आहेत.
पण आज यूपी संपूर्ण देशात मॉडेल म्हणून विकसित झाले आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. दिल्ली आणि नोएडाचे रस्ते स्वतः पहा 10 दिवसांत 10 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. जर तुम्ही प्रयागराजला गेलात तर तुम्हाला उत्कृष्ट रस्ते मिळतील, कुठेही घाण होणार नाही आणि वीजही असेल.





