AAP: गुजरात निवडणुकीत ‘आप’ला मोठा फायदा; राष्ट्रीय पक्ष होण्याची मिळणार संधी

नवी दिल्ली – गुजरात विधानसभेत पूर्ण शक्ती लावूनही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला काही यश मिळत नसल्याचे एक्झिट पोलवरून दिसते आहे. स्वत: केजरीवाल यांनी तर त्यांचेच सरकार येणार असल्याचे लिहून दिले आहे. मात्र चाचण्यांच्या आकड्यानुसार त्यांना दोन आकडी संख्याही गाठता येणार नसल्याचे सांगितले जाते आहे. असे असले तरी केजरीवालांचा गुजरातमध्ये दोन जागा मिळाल्या तरी फायदाच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार आहे. आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थापित करण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र त्याकरता त्यांना आणखी काही गोष्टी हव्या आहेत. त्या त्यांना गुजरातमधून साध्य होउ शकतात.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी आवश्यक गोष्टी
1. कोणत्याही पक्षाला तीन राज्यांच्या लोकसभा निवडणुकीत 2 टक्के मते मिळणे आवश्यक असते. तरच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते.
2. लोकसभेच्या चार जागांखेरीज कोणताही पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत सहा टक्के मते मिळवेल किंवा विधानसभा निवडणुकीत किमान चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांत सहा टक्के मिळवले तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
3. कोणत्याही पक्षाला चार िंकवा जास्त राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असली पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला याच आधारावर 2019 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. आता गुजरातचा निकाल झाल्यावर आम आदमी पक्षही हा निकष पूर्ण करण्याची शक्यता आहे.
4. वरील तीन अटींपैकी एक जरी अट कोणत्या पक्षाने पूूर्ण केली तर त्यांना राष्ट्रीय दर्जा मिळतो.
आता राष्ट्रीय पक्ष कोणते?
1 भारतीय जनता पार्टी
2 कॉंग्रेस
3 बहुजन समाज पार्टी
4 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
5 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
6 तृणमूल कॉंग्रेस
7 नॅशनल पीपल्स पार्टी





