चंदिगढ : पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी त्या राज्यातील सत्ताधारी आपने उद्योगपती राजिंदर गुप्ता यांची उमेदवारी जाहीर केली. विधानसभेत आपकडे घवघवीत बहुमत असल्याने गुप्ता यांचे खासदार बनणे निश्चित मानले जात आहे. आपचे नेते आणि पंजाबमधील मंत्री संजीव अरोरा यांनी नुकताच विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली. ती भरण्यासाठी २४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होईल. अरोरा यांच्या राजीनाम्यानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभा सदस्य बनतील, अशी चर्चा याआधी होती. मात्र, स्वत: केजरीवाल यांनीच ती चर्चा फेटाळून लावली होती. त्यानंतरही सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर गुप्ता यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पूर्णविराम मिळाला. राज्यसभेवर औपचारिक निवड झाल्यानंतर गुप्ता यांना खासदार म्हणून ९ एप्रिल २०२८ पर्यंत कार्यकाळ लाभेल. त्यांनी नुकताच पंजाब आर्थिक धोरण आणि नियोजन मंडळ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यावेळीच त्यांची राज्यसभा सदस्यपदी वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळाले.