Gujarat Elections 2022 : ‘RSS’ मधूनच ‘AAP’ पक्षाचा जन्म; कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

हैदराबाद – आम आदमी पक्ष हा काही वेगळा पक्ष नसून तो भारतीय जनता पार्टीचाच सहकारी पक्ष आहे. 2012 च्या इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये या पक्षाचा जन्म झाला आहे व तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची संघटना आहे असा दावा आणि टीका कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे.
भाजप आणि आप या दोन्ही पक्षांचे मुद्दे आणि भाषा जवळपास सारखीच आहे. ते जेव्हा एकमेकांच्या विरोधात बोलतात तेव्हा तो केवळ एक दिखावा आणि राजकीय टीका असते. आम आदमी पक्ष माध्यमांमधून भरपूर जाहीराती करतो आहे. माध्यमे त्यांच्या जाहीरातींनी भरली आहेत मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे.
गुजरातमध्ये खरी लढत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातच आहे. आम आदमी पार्टीने आपले उमेदवार केवळ कॉंग्रेसची मते खाण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी उभे केले आहेत, असे रमेश यांनी सांगितले.
पुढे त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांनाही त्यांनी लक्ष्य केले. त्यांचा एमआयएम पक्ष भाजपची बी टीम असून भाजपचा ऑक्सिजन घेऊन संघाचे हात मजबुत करण्यात ते गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला.





