अहमदाबाद – आपने मंगळवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. त्या पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे सार्वजनिक केली आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीत आपने इतर प्रमुख पक्षांपेक्षा आघाडी घेतल्याचे दिसते.
गुजरातमधील निवडणुकीची घोषणा लवकरच होईल. मात्र, त्याआधीच आपने निम्म्याहून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. त्या राज्यात प्रदीर्घ काळापासून भाजप सत्तेवर आहे. भाजपचा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जाते.
मात्र, यावेळी भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनण्याचा निर्धार आपने केला आहे. त्यातून आपने विशेष रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून त्या पक्षाने इतर पक्षांच्या आधी उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला.
Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान
आक्रमक प्रचाराचे तंत्रही आपने अवलंबले आहे. भाजप आणि कॉंग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. ते पक्ष निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच उमेदवार जाहीर करतील. आपमुळे यावेळच्या गुजरात निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या राज्यात 2017 या वर्षाच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपने 99, तर कॉंग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या.