Dhoni CSK Stake : सीएसके-धोनी यांच्यातील वादावर आकाश चोप्राच मोठं वक्तव्य; म्हणाला, “२५ टक्के हिस्सेदारी म्हणजे…”
Dhoni CSK Stake : फ्रँचायझी व धोनीमध्ये मतभेद झाल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. यावर आता आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

Aakash Chopra Reacts To Viral Claims Of MS Dhoni Demanding 25 Percent Stake In CSK : सीएसकेचा (CSK) माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्याबाबत सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा व्हायरल होत आहे. धोनीने सीएसके फ्रँचायझीमध्ये तब्बल २५ टक्के मालकी हक्क (Stake) मागितल्याचा आणि त्यावरून फ्रँचायझी व धोनीमध्ये मतभेद झाल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. या अफवांवर आता भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) जोरदार निशाणा साधला असून, हा दावा पूर्णपणे अवास्तव आणि ‘प्लँटेड स्टोरी’ असल्याचे म्हटले आहे.
‘२५ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी ४०० दशलक्ष डॉलर लागतात!’; आकाश चोप्राचे गणित
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “सीएसके ही जागतिक क्रिकेटमधील अत्यंत मोठी फ्रँचायझी असून तिचे स्वतःचे मोठे ब्रँड व्हॅल्यूएशन आहे. जर सीएसकेचे मूल्य अंदाजे १.८ अब्ज डॉलर (सुमारे १५ हजार कोटी रुपये) मानले, तर त्यातील २५ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी तब्बल ४०० दशलक्ष डॉलर (३,३०० कोटींहून अधिक रुपये) गुंतवावे लागतील. एवढी प्रचंड रक्कम कोणाकडेही गुंतवणूक करण्यासाठी असणे अशक्य आहे. त्यामुळे धोनीने इतकी मोठी हिस्सेदारी मागितली हा दावाच मुळात हास्यास्पद आणि बकवास आहे.”
कोणतीही आयपीएल फ्रँचायझी कोणालाही एवढी हिस्सेदारी देणार नाही!
आकाश चोप्राने पुढे स्पष्ट केले की, “आयपीएलमधील कोणतीही फ्रँचायझी कोणालाही सहजासहजी २५ टक्के किंवा अगदी ५.५ टक्के हिस्साही देऊ शकत नाही. २, ३ किंवा ५ टक्के हिस्सेदारीची रक्कमही हजारो कोटींच्या घरात जाते. धोनीसारखा समजूतदार खेळाडू अशी मागणी कधीच करू शकत नाही आणि अशा प्रकारची कोणतीही चर्चा फ्रँचायझीसोबत झाली असण्याची शक्यता शून्य आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी निव्वळ कल्पोकल्पित वाटतात.”
‘हा कोणाचा तरी डाव, स्टोरी प्लँटेड वाटते!’; चोप्राचा मोठा संशय
धोनी आणि सीएसके व्यवस्थापनामध्ये हिस्सेदारीवरून वाद झाल्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करताना चोप्रा म्हणाला, “२५ टक्के मागणे, फ्रँचायझीने नकार देणे, मग ३.५ किंवा ५.५ टक्क्यांवर चर्चा घसरणे आणि त्यावरून मतभेद होणे ही सर्व कहाणी रचलेली वाटते. आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणीतरी ही बातमी मुद्दाम पसरवली असावी असा मला संशय आहे. अधिकृत माहिती नसल्याने मी थेट याला फेक न्यूज म्हणणार नाही, पण यात काडीचेही तथ्य दिसत नाही.”





