मुंबई : सध्या देशभरात सर्व निवडणूकांमध्ये वोटचोरी म्हणजे निवडणूक चोरी. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार येणार वाटत होते, पण तेव्हा हा गैरप्रकार पकडता आला नाही. ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाही, तर मतदारयादी हातात घेऊन होईल, असे ठाकरेसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच वरळीत २२-२३ हजार मतदारांची गडबड असल्याचे सांगत, मुंबईत लाखो असे असतील, असा इशारा दिला. निवडणूक आयोग भाजपचे काम करत असल्याने आम्हाला त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. बोगस सरकारचे बोगस मतदार या मथळ्याखाली आदित्य ठाकरे यांचे मतदार याद्यांमधील घोळाबाबत सादरीकरण पार पडले. ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी सादरीकरण केले. आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचे मार्गदर्शन आदित्य ठाकरेंनी केले. आदित्य ठाकरे म्हणाले, लोकसभेत २,५२,९७० ते विधानसभेत २,६३,३५२ मतदारांपर्यंत वाढ झाली असून, १६,०४३ नवीन मतदार जोडले गेले, तर ५,६६१ काढले गेले. यात १९,३३३ मतदार गडबडीत आहेत, असा खळबळजनक दावा केला. यात मतदाराचे नाव आणि वडिलांचे नाव एकसारखे असलेले ५०२ मतदार सापडले. म्हात्रे नावाच्या मतदाराचे वडील पटेल असलेले ७२० जण आहेत. महिलांचे लिंग पुरुष म्हणून नोंदलेले ६४३ जण आहेत. एपिक नंबर नसलेले २८ आणि समान एपिक असलेले १३३ मतदार असल्याचे सांगत, सेम व्यक्तीला वेगळे एपिक देण्याची उदाहरणे दिली. नरहरी कुलकर्णी लोकसभेत मृत म्हणून काढले गेले, पण विधानसभेत परत आले आणि मतदान केले, असा प्रकारही आदित्य ठाकरेंनी उघड केला.