Aaditya Thackeray : आगामी राज्यसभा आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. राज्यसभा आणि परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, आकडेवारी पाहिल्यास राज्यसभेच्या निवडणुकीची जागा ठाकरेसेनेची आहे आणि मविआमध्ये निश्चितच त्या दिशेने चर्चा होईल. सत्ताधारी महायुतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात संख्याबळ असल्याने, मविआ राज्यसभा आणि विधानपरिषदेत प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत ठाकरेसेनेचे २० आमदार आहेत, त्यानंतर काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादीचे(शप) १० आमदार आहेत ठाकरेसेना नेते संजय राऊत म्हटले की, राष्ट्रवादी (शप) चे प्रमुख शरद पवार, ज्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे, ते पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पवारांसोबतच ठाकरेसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी(शप) च्या फौजिया खान, आरपीआय (आठवले)चे रामदास आठवले, भाजपचे भागवत कराड, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील यांचा राज्यसभा कार्यकाळही संपणार आहे. विधान परिषदेतील ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत.