Aaditya Thackeray : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आदित्य ठाकरे भडकले; म्हणाले, “आम्ही आधीपासूनच..”
Aaditya Thackeray : या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर जोरदार टीका केली.

Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिल्लीतून झालेल्या निर्णयामुळे मोठा राजकीय धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे हे सहाही खासदार आता कायदेशीरदृष्ट्या शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार ठरले आहेत.
६ खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर जोरदार टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती. आम्ही सातत्याने अन्याय सहन करत आहोत आणि हा प्रकार संपूर्ण देश पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले, तेच देशासोबत घडत आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय दिना पाटील (मुंबई दक्षिण-ईशान्य), संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) या सहा खासदारांनी नंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.
पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई टाळण्यासाठी या खासदारांनी प्रथम लोकसभेत स्वतंत्र गटाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला. या प्रक्रियेला ठाकरे गटाने तीव्र विरोध केला होता आणि संबंधित खासदारांच्या अपात्रतेची मागणीही केली होती. मात्र, यावर लोकसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या गटाना मान्यता दिली.
त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मंजुरी दिल्याने सहाही खासदारांची सदस्यता सुरक्षित झाली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय आणि कायदेशीर धक्का बसला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढवून ती संख्या आता १३ वर जाऊन पोहचली आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गट पुढे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ShivSena News: सहा बंडखोर खासदारांच्या गटाला ठाकरे गटाकडून आक्षेप; अन् अखेर निर्णय झालाच…






