मुंबई- मुंबई आधीच खड्ड्यांनी त्रस्त आहे, त्यात आता मुंबईकरांवर घन कचरा कर लादला जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला. “हा अदानी कर आहे, आम्ही तो देणार नाही,” असं ठाम मत त्यांनी मांडलं. मुंबई महापालिकेकडे कचरा उचलण्याची यंत्रणा असतानाही कचरा उचलला जात नाही आणि आता देवनार डम्पिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “मुंबईची लूट सुरू आहे”- आदित्य ठाकरे म्हणाले, “महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कचऱ्यावर कर लावला जातोय. उद्धव ठाकरे सरकारने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिली होती, पण आता या घरांनाही कचरा कर लादला जाणार आहे. हा कर तीन वर्षांनी वाढणार असून, अदानीला हवं तर पुढच्याच वर्षी वाढेल. छोट्या दुकानांपासून घरांपर्यंत सगळ्यांवर कर लादला जातोय, कारण गेल्या अडीच वर्षांत या सरकारने मुंबई महापालिकेची लूट केली आहे.” मुंबईकरांनी विरोध करावा – “हा अदानी कर आहे, याचा कडाडून विरोध करा,” असं आवाहन ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं. “३१ मेपर्यंत यावर सूचना मागवल्या आहेत. प्रत्येकाने ‘हा कर देणार नाही’ असं सांगावं. बीएमसीने आधी अदानीकडून ७,५०० कोटींचा प्रीमियम वसूल करावा, जो त्यांनी माफ केला,” असं ते म्हणाले. त्यांनी रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई आणि कचरा न उचलण्यावरही प्रश्न उपस्थित केले. “कचरा उचलण्याची यंत्रणा तुमच्याकडे आहे, मग हा कर कशासाठी?” असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. “हे सरकार एप्रिल फूल” – “लाडकी बहीण, शेतकरी योजना, शिवभोजन थाळी, मध्यान्न आहारातून अंडी बंद केली. हे सरकार एप्रिल फूल आहे,” असा टोला त्यांनी लगावला. चैत्र नवरात्रीत मटण बंदीच्या मागणीवर ते म्हणाले, “आमचं मराठमोळं हिंदुत्व आहे. आम्ही कोळंबी, मटण खातो. आम्हाला काय खायचं हे तुम्ही ठरवणार का?” मराठी भाषेसाठी लढा सुरूच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.