Aaditya Thackeray : बदनामीचा आरोप तथ्यहीन; आदित्य ठाकरे यांचे सतीश सालियन यांच्या नोटिशीला प्रत्युत्तर
वकील अंशुमन सिन्हा यांच्यामार्फत पाठवलेल्या उत्तरात ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नमूद केले की, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचा कोठेही उल्लेख नव्हता.

Aaditya Thackeray : दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी केलेला बदनामीचा आरोप तथ्यहीन आहे. त्यामुळे माफी मागण्याचा किंवा नुकसानभरपाई देण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सतीश सालियन यांनी दिलेल्या मानहानीची नोटीशीला दिले आहे. तसेच ठाकरे यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
वकील अंशुमन सिन्हा यांच्यामार्फत पाठवलेल्या उत्तरात ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नमूद केले की, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचा कोठेही उल्लेख नव्हता.
माझ्या अशिलांच्या पोस्ट्स या राजकीय व्यक्ती, स्वार्थ साधू पाहणारे गट आणि प्रसारमाध्यमांच्या काही घटकांकडून चालवल्या जाणाऱ्या त्या सातत्यपूर्ण मोहिमेबाबत होत्या, ज्यांनी एसआयटीच्या दोन तपास अहवालांमध्ये कोणतीही पडताळणी केलेली साक्ष किंवा पुरावा नसतानाही त्यांचे नाव वारंवार या दुर्दैवी प्रकरणाशी जोडले आहे. तसेच सतीश सालियन यांच्याबद्दल कोणतेही बदनामीकारक विधान केलेले नाही.
ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या आधीच्या सार्वजनिक विधानावर ठाम राहून पुन्हा सांगितले की, ते दिशा सालियन यांना कधीही भेटले नव्हते किंवा त्यांना ओळखतही नव्हते. तसेच २०२० मध्ये मुलीच्या मृत्यूनंतर लगेचच आणि त्यानंतरच्या काळात सतीश सालियन यांनी दिलेली विधाने ही वस्तुस्थितीच्या दृष्टीने विसंगत असल्याचेही यात निदर्शनास आणून दिले आहे.





